Sunday, September 2, 2012

शब्द

शब्दातून अल्लड गाणे मज शब्द करी दिवाने.
शब्दातून जन्मा आले जगण्याचे गीत नव्याने.

शब्द हे हसरे शब्द हे दुखरे,शब्दातून मोर पिसारे.
शब्दात स्पन्दुनी जडले शब्दातून शब्द इशारे. 

शब्दाविन भाव न कळला, शब्दातून भाव सांडला.
शब्दाला शब्द तो मिळला, शब्दाचा डाव मांडला.

शब्द एकटे शब्द जोडूनी शब्दाने जग हे तरले. 
नयनाचा भाव पाहुनी शब्द निःशब्द होऊनी हरले.                                            
                                           - कवी शैलेश.

Friday, July 27, 2012

आनंद घेऊन जगायचंय.....

धावत हे मन माझ मला एकदा पकडायचय.
कुठे नक्की चाललं आहे हे एकदा पुसायचंय.

वाटेवरी असे विसावा हे एकदा दाखवायचय.
धावण्याला या अंत नसावा हे एकदा सांगायचय.

रोजच्या शिळ्या जीवनातले नवेपण शोधायचं.
आनंदाच्या एक क्षणाला मला मोहरून जायचंय.

इतरांना मी रोज भेटतो स्वतःला एकदा भेटायचंय.
स्वतःशीच बोलता बोलता अंतर्मुख होऊन जायचय.

रटाळलेल्या वाटा जुन्या मला सोडून जायचंय.
आनंदामागे धावण्यापेक्षा आनंद घेऊन जगायचंय..
                                                    - कवी शैलेश

Monday, July 9, 2012

ढगांचा खेळ ...



वारा सुटतो सुसाट वाहतो मेघा मधुनी थेंब उडवितो.
मेघ कसला शांत राहतो ठोसा मारुनी सूड उगवितो
वारा निघतो ठोसा चुकतो दुसर्या मेघा वार लागतो.
गडगड असा आवाज होई चित्कार नभी गर्जू लागतो.
वीज हासते नाचू लागते नभ कलह वाढू लागतो.
धरणीवरती नृत्य रंगते, भरभर पाऊस पडू लागतो
कलह माजला प्रश्न उरला थेंब नभातून कुणी उडविला
वरुणाचा दूत बनुनी वारा खोड्या काढू लागला.
कधी नसती मेघ पुरेसे पाऊस कसा बरसू लागतो
कधी भरल्या मेघांनाही रुसवा तरी कशाचा येतो.
प्रश्न हे, प्रश्नच सारे उत्तर कोण शोधू पाहतो.
वरुण कुणाला कधी भेटतो, कोण त्याला भेटू पाहतो.
                     - कवी शैलेश.

Wednesday, July 4, 2012

पाऊस माझा लाडका...


नको रुसू लडीवाळा कुठे गेलास निघून,
वाट पाहते हि धरणी रोज अश्रू ढाळून.

कसा धावत यायचा जग कुशीत घ्यायचा.
वाहनार्या वार्यालाही तुझा हेवा वाटायचा.

आनंदाने तुझ्या पाने फुले नाचायची.
धरुनी फांदीला जणू झिम्मा घालायची.

तू नसशील तेव्हा कोण पेलणार भार.
नको हिरे माणके हवी तुझी एक धार.

परत येईन लवकर अस म्हणला जाताना.
गारगार गारा तुझ्यासाठी आणेन येताना.

का फसवतो तू आज तुझ्या लेकरांना.
नको तुझ्या गारा आम्ही भुकेलो थेंबांना.

देतो पैसा म्हणून खोटा पैसा टेकविला.
लेकरांच्या खेळाचा जणू रागच मानला.

खरा पैसा आहे तरी वाट तुझीच पाहतो.
एका एका थेंबासाठी माझा जीवच आटतो 

नाही आलास तर काही बोलणार नाही.
झाला उशीर तर कोणी दिसणार नाही. 
                                                      -कवी शैलेश 

Monday, July 2, 2012

सुखाची साधना...


गंजलेल्या या मनाला चैतन्याची धार हवी.
सुन्नलेल्या  विचारांना आनंदाची किनार हवी.

संकल्पलेला आनंद ठेवा कुठे म्हणून शोधावा.
दु: खाच्या या वाटेतून मार्ग  मीच निवडावा.

सुखाचे हे समुद्र मंथन , हलाहल पण देऊन जाते.
सुख मार्ग बिकट आहे हेच जणू शिकवून जाते.

गोंदलेल्या प्रारब्ध रेषा स्वतःच आज मिटवाव्या.
आनंदाने आनंदासाठी  वाटा आज तुडवाव्या

दुःख कसले मानु स्वतःचे इतरांचा डोंगर आहे.
ओंजळ भरली हि दुः खाने सुखाचा तर सागर आहे.




Monday, April 16, 2012

प्रासंगिक - १

मृदगंधाची कुपी घेऊन स्वैर वारा सुसाट निघाला.
चुकुनी कुपीमधला एक थेंब धरणीवर सांडला.
                                             - कवी शैलेश

Monday, February 27, 2012

वेढलेले दिवस सारे.....



वेढलेल्या विचारांनी वेढलेले मन सारे.
वेढलेल्या ब्रम्हांडात या वेढलेले सूर्य तारे.

सुखासाठी घेतलेले दु: खा भोवती वेढे सारे.
वेढ्यात मश्गुल जाहले सुख दु:खाचे हे पसारे.

मोकळा हा श्वास घ्यावा, थंड वारा उरी भरावा.
भरलेल्या या उरावर दु:खाचा हरएक वार घ्यावा.

वेढ्यात मुग्ध होण्यापलीकडेहि  जीवनाचा अर्थ आहे.
वेढ्यात राहून  कंठ्लेले आयुष्याच हे व्यर्थ आहे.

वाट कुणाची पाहू नको आता, तू तुझा समर्थ आहे.
इतरांना सुख वाटणे, हाच जीवनाचा अर्थ आहे.
                                                        - कवी शैलेश